औरंगाबाद : औरंगाबादमधील पिंपळगाव वळण या गावात चक्क एक किलोमीटरची रांग लागल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे. ही रांग एखाद्या मंदिराची नसून काविळचं औषध मिळावं यासाठी लावण्यात आली आहे. या गावातील सर्जेराव वाढुळे हे एक कप दुधातून एक चमचा झाडपाल्याचा रस देतात आणि यामुळे काविळ बरी होते असा लोकांचा विश्वास आहे.
सर्जेराव वाढुळे हे केवळ रविवार आणि गुरवार या दोनच दिवशी औषध देतात. त्यामुळे अगदी पहाटे पासूनच लोक रांगा लावतात. केवळ औरंगाबादमधूनच नाही, तर आसपासच्या जिल्ह्यातूनही लोक येतात.
गेल्या काही वर्षापासून वाढुळे हे लोकांनाकडून उपचाराचे पैसेही घेत नाहीत आणि कोणी दिलेच तर केवळ 10 रुपये घेतात.
काविळ हा विषाणूंमुळे किंवा काही आजाराच्या यकृतावरील दुष्परिणामांमुळे होणारा रोग आहे. हा मुख्यत्वेकरून यकृताचा रोग आहे. त्यामुळे झाडपाल्याच्या उपचारापेक्षा काविळवर योग्य उपचार घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टर सांगतात.
हा नेमका कोणत्या झाडपाल्याचा रस आहे याबाबत वाढुळेंनी माहिती दिली. वाढुळेंच्या औषधानं काविळ बरी होते का? हा संशोधनचा विषय आहे. मात्र, विज्ञान युगातही लोकांचा या झाडपाल्याच्या रसावर विश्वास असल्याचं आजही दिसून येत आहे.