नागपूर : नागपूरमध्ये मराठा मोर्चासाठी सर्वपक्षीयांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे बहुसंख्य मंत्री, आमदार मोर्चात सहभागी होत आहेत. तर विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदारही मोर्चात सहभागी होणार आहेत.


मात्र या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार दिसले नाहीत. त्याबाबत माजी मंत्री जयंत पाटील यांना विचारलं असता, त्यांनी "अजित पवार आज बारामतीत निवडणूक असल्याने त्याठिकाणी व्यस्त आहेत, म्हणून मराठा मोर्चात सहभागी होऊ शकणार नाहीत", असं सांगितलं.

जयंत पाटील म्हणाले, "विधानसभेचं कामकाज सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या आमदारांना मराठा मोर्चात सहभागी व्ह्यायचं आहे ते होतील. अजित पवार आज बारामतीत निवडणूक असल्याने त्याठिकाणी व्यस्त आहेत, म्हणून मराठा मोर्चात सहभागी होऊ शकणार नाहीत".

मराठा मोर्चाचा स्थानिक निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसला म्हणून तुम्ही मोर्चापासून दूर आहात का? असा प्रश्नही जयंत पाटील यांना विचारण्यात आला.

त्यावर पाटील म्हणाले, "इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीतमध्ये कुठल्याही सामाजिक समीकरणाचा मला फटका बसलेला नाही. सर्व समाज माझ्या पाठीशी आहे".

राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते

दरम्यान काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मराठा मोर्चात सहभागी होणार असल्याचं सांगितलं. काँग्रेसचे सर्व आमदार मोर्चात सहभागी होतील.

यावेळी विखे पाटील यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.

"शिवसेनेचे आमदार भगवे फेटे घालून सभागृहात आले. शिवसेनेने हा मोर्चा साजरा करण्याचं कारण नाही. हे सत्तेत असून विरोध करतात. हे इव्हेंट मॅनेजमेंटचे सरकार आहे", अशी टीका विखेंनी केली.