मुंबई : अमित शाह आणि नरेंद्र मोदी समजण्यासाठी संजय राऊत यांना बरेच जन्म घ्यावे लागतील असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांना लगावला. तसेच ठाकरे आणि मोदींमध्ये विसंवाद निर्माण करण्यासाठी संजय राऊतच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मुंबईत भाजपची कार्यकारिणी बैठक सुरु आहे. त्यावेळी शेलारांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आशिष शेलार यांनी गेले काही दिवसांपासून रोज सकाळी पत्रकार परिषद घेणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शेलार म्हणाले, नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात विसंवाद निर्माण करण्याचा एकपात्री वगनाट्य रोज सकाळी आपण टीव्हीवर पाहतोय. संजय राऊत यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेनेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मोदींचे बाळासाहेबांबरोबर खास नातं होतं. हे नातं ते पंतप्रधान होण्याआधीपासूनचं होतं. आता एक अदृश्य शक्ती मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये फूट पाडू पाहत आहे. अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा पक्षाच्या निर्णयाबद्दल बोलतात तेव्हा एकाच सुरात बोलतात तेव्हा त्यांच्यात कुठलाही विसंवाद नसतो.
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना समजण्यासाठी संजय राऊतांना अनेक जन्म घ्यावे लागतील, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला. त्यातच संजय राऊत यांचा शुक्रवारी (15 नोव्हेंबर) वाढदिवस असतानाच वयासोबत त्यांच्या विचारांची परिपक्वताही वाढावी, असाही टोमणा शेलार यांनी दिला. उद्यापासून आमचे सगळे आमदार आणि खासदार अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणार असल्याच शेलार यांनी सांगितले.
पूर्वी मातोश्रीमधून राज ठाकरेंना भेटण्यासाठीही कुणी जात नव्हतं. मात्र आता माणिकराव ठाकरेंना भेटण्यासाठी जाण्याची वेळ आली. तिन्ही पक्षांचं सुरु असलेलं नाटक महाराष्ट्र पाहत आहे. सत्तेच्या हव्यासापोटी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एकमेकांना भेटण्यासाठी ओढ लागली आहे. यापूर्वी ज्येष्ठ नेत्यांना मातोश्रीवर बोलवलं जायचं आता यांनाच चर्चेसाठी बाहेर पडाव लागत आहे, असं म्हणत आशिष शेलार यांनी थेट उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला.
अमित शाह आणि नरेंद्र मोदी समजण्यासाठी संजय राऊतांना बरेच जन्म घ्यावे लागतील : आशिष शेलार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Nov 2019 01:00 PM (IST)
आशिष शेलार यांनी गेले काही दिवसांपासून रोज सकाळी पत्रकार परिषद घेणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -