सातारा: खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज (शनिवार) राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले पोलिसांसमोर हजेरी लावण्याची शक्यता आहे.


खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून आऊट ऑफ कव्हरेज झालेले उदयनराजेंनी काल रात्री साताऱ्यात रोड शो केला. पोलिसांनी मात्र या रोड शोकडे दुर्लक्ष केलं. दरम्यान, साताऱ्याच्या रोड शोनंतर उदयनराजे रात्रीच पुण्याच्या दिशेनं रवाना झाले.

उदयनराजे पोलीस स्टेशनमध्ये दाखल होतील या अपेक्षेनं कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनबाहेर गर्दी केली होती. तर तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं उदयनराजेंना समर्थन देण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

‘साताऱ्यात 36 हजार एकर जमीन असणाऱ्या उदयनराजेंना 2 लाखांच्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक म्हणजे छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे.’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.