कोल्हापूर : मुसळधार पावसामुळं कोल्हापुरातले नदी-नाले दुधडी भरुन वाहत असून, पंचगंगेची पाणी पातळी 41 फुटांवर पोहचली आहे. तर राधानगरी धरण 90 टक्के भरल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील 150 गावांचा संपर्क तुटला आहे.


गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर परिसरात पावसाची जोर कायम असून, पंचगंगेची पाणीपातळी 41 फुटांवर पोहचली आहे. त्यामुळे कोल्हापूर-शिये, कसबा-बावडा मार्गावर पाणी आल्याने या मार्गावरुन एकेरी वाहतूक सुरु आहे.

दुसरीकडे राधानगरी धरणही 90 टक्के भरल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली गेले असून, 34 मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर 150 गावांचा संपर्क तुटला आहे.

दरम्यान, कोल्हापुरातील मुसळधार पावसाचा फटका मुक्या जीवांनाही बसला आहे. जिल्ह्यातील आसुर्डे पोर्ले परिसरात कासारी नदी पात्रात झाडावर 3 वानर गेल्या 6 दिवसांपासून अडकून पडली होती.

मासेमारीसाठी गेले असताना गावकऱ्यांना ही गोष्ट लक्षात आली. त्यानतंर गावकऱ्यांनी याची माहिती वनविभाग आणि व्हाईट आर्मी या स्वयंसेवी संस्थेला दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पूरस्थितीमुळे वानरांना रेस्क्यू करणं कठीण झालं आहे. त्यामुळे झाडावर अडकलेल्या वानरांनसाठी केळी आणि भूईमुगाच्या शेंगा देण्यात आल्या आहेत.