बीड : "64 आमदार असलेल्या पक्षाचा इथे मुख्यमंत्री होतो, 54 आमदार असलेल्या पक्षाचा इथे उपमुख्यमंत्री होतो आणि 105 आमदार असलेल्या पक्षाचा इथे विरोधी पक्षनेता होतो याला लोकशाही म्हणायचं," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारात अंबाजोगाईमध्ये आयोजित जाहीर सभेत धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी मुंडे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.


धनंजय मुंडे म्हणाले की, "सत्ता स्थापन झाल्यानंतर मला एकाने विचारलं लोकशाही काय आहे? मी म्हणालो, या देशाला विधानसभेच्या निवडणुकीनंतर लोकशाही दाखवली आहे. 64 आमदारांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, 54 आमदार असलेल्या पक्षाचा उपमुख्यमंत्री होतो, 44 आमदारांच्या पक्षाचे मंत्री बनतात आणि 105 आमदारांचा विरोधी पक्षनेता होतो, त्याला लोकशाही म्हणतात. लोकशाही काय असते हे पवारसाहेबांनी दाखवून दिलं आणि कार्यकर्ता म्हणून आम्हाला गर्व आहे."


"भाजपने मधल्या काळात फोडाफोडी केली होती. त्यावेळी भाजपला सांगितलं होतं की पवारसाहेबांचा नाद करु नका. पण सुधारणार नाहीत. पवारसाहेब की लाठी ऐसी बैठी है, बहुत दिनों के बाद पता चला है की कैसी बैठी है," असा घणाघातही धनंजय मुंडे यांनी केला.


यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, "कोरोनापासून आपण आणि आपल्या कुटुंबाला वाचवतोय तसंच भाजपच्या संसर्गातून सुद्धा तुम्हाला यापुढे आपल्या कुटुंबाला दूर ठेवावे लागेल."


दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनीही भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी मिटकरी म्हणाले की, "भाजपवाले रोज मंदिरात जातात. सर्वात जास्त पापी इतर तुमच्याच पक्षात आहेत. लोकांच्या मुली पळवून आणण्याची भाषा करणाऱ्यांनी मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करावे का? मंदिराचा ठेका फक्त भाजपवाल्यांनीच घेतलाय का?" एवढेच नाही तर "चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणीस, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार या लोकांनी भाजपचं वाटोळं केलं," अशी टीकाही अमोल मिटकरी यांनी केली.