सोलापूर : आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी शासनाकडून नव्याने पालखी मार्ग (Pandharpur) बनविण्यात येत आहे. मात्र, या मार्गावरील रस्ता पहिल्याच पावसात खचल्याचं पाहायला मिळालं. या मार्गावरील वेळापूर ते वाखरी मार्गावर दसूर येथे हा मार्ग (Road) खचू लागल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम या दोन्ही पालख्या एकत्र येतात, त्या दसूर पाटीजवळ हा मार्ग खचल्याचे दिसून आले. त्यामुळे, प्रशासन खडबडून जागे झालं आहे.
पालखी मार्गावरील हा महामार्ग खचल्याची माहिती होताच, तातडीने प्रशासनाने याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. आषाढी यात्रा काळात कोणताही धोका होऊ नये यासाठी प्रशासन गंभीर असले तरी इतक्या अल्पावधीत हा मार्ग कसा खचू लागला असा सवाल वारकरी व भाविकांतून उपस्थित होऊ लागला आहे. सुरुवातीला ज्या ठिकाणी हा मार्ग खचू लागला होता, त्या भागाची दुरुस्ती करण्यात आल्यावर अजूनही ज्या ठिकाणी अशा पद्धतीने हा मार्ग खचू शकतो तेथेही दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
प्रशासनाकडून काम सुरू
दरम्यान, याठिकाणी काम सुरू असल्याचे फलक लावून या भागातील माती व मुरूम काढण्यात आला आहे. पावसाळा सुरू असतानाही आता या भागाची दुरुस्ती तातडीने केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्या सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढीसाठी पालखी मार्गावर कोणत्याही प्रकारची अडचण किंवा त्रास होता कामा नये असे आदेशच प्रशासनाला दिले आहेत. त्यासाठी आता पंढरपूरहून वेळापूरकडे जाणारी एक लेन 3 किलोमीटरपर्यंत बंद करण्यात आली आहे. या ठिकाणी रस्त्याला मोठ्या भेगा पडल्याचे दिसत असून या कामाच्या दर्जावरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
जिल्हा प्रशानसनाकडून तयारी
विशेष म्हणजे आषाढी वारीला पुढील काही दिवसांत सुरुवात होणार असून पालखी प्रस्थानाला काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे, जिल्हा प्रशासनाकडून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू आहे. मात्र, अशा पद्धतीने नव्याने बनविलेला पालखी मार्ग खचल्याने वारकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मानाच्या पालख्या पंढरपूरकडे करणार प्रस्थान ठेवणार असून त्यापूर्वीच प्रशासनाला ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत.