सिंधुदुर्ग : तळकोकणातील दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात रात्री हत्तीचा थरार गावातील तीन व्यक्तींनी अनुभवला. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भेकुर्ली गावातून मोर्ले गावात घरी जात असताना दुचाकीची लाईट फणसाच्या झाडाखाली फणस खात असलेल्या टस्कर हत्तीच्या डोळ्यावर पडली आणि त्याने पाठलाग सुरु केला. हत्ती पाठलाग करतोय हे समजताच. त्या तिघांनीही दुचाकी तिथेच टाकत पळायला सुरुवात केली. टस्कर हत्तीने पाठलाग केल्यामुळे हत्तीपासून वाचण्यासाठी जवळच रस्त्याचा पूल होता. या पुलाला सिमेंटचा पाईप होता. त्या तिघांनी या पाईपमध्ये रात्री दहा वाजल्यापासून सुमारे तीन तास बसून काढले. साधारणपणे अर्धा तास हत्ती त्या पाईपमध्ये सोंड घालून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत होता. शिवाय मध्येच ओरडत सुद्धा होता.


हत्तीच्या पाठलागामुळे जीव मुठीत धरुन हे तिघेही पाईपमध्ये बसून होते. विनायक देसाई, सदा देसाई, सचिन देसाई या तिन्ही व्यक्तींना रात्रीच्या निरव शांततेत हत्तीचा थरार याची देही याची डोळा अनुभवला. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्या तिघांचे प्राण वाचले. गेल्या महिन्याभरापासून तस्कर हत्ती मोर्ले गावात बागायतीचे, शेतीचे नुकसान करत आहेत. वस्तीतही वावर वाढला आहे. त्यामुळे मोर्ले गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यात गेली दहा ते बारा वर्षे हत्तींचा वावर आहे. तिलारी धरणाचं मुबलक पाणी, आजूबाजूला केळी, अननस, नारळ, पोफळीच्या बागा असल्याने खाद्यही मुबलक प्रमाणात असल्याने हत्ती याठिकाणी स्थिरावले. लॉकडाऊन झाल्यामुळे नागरिकांची रहदारी कमी झाल्याने हत्ती जंगलातून आणि रस्त्यावर मुक्तपणे फिरु लागले. त्यामुळे काल रात्री हत्ती रस्त्यालगत असलेल्या फणसाच्या झाडाखाली फणस खात असताना, डोळ्यावर लाईट पडल्याने त्याने तिघांचा पाठलाग केला.


तिलारी खोऱ्यातील सध्यस्थितीत असणाऱ्या पाच हत्तींना या भागातून घालवण्यासाठी वनविभागाकडून अनेक प्रयत्न करण्यात गेले. मात्र हत्ती तिलारीच्या खोऱ्यात स्थिरावले आहेत. केर, भेकुर्ली, मोर्ले या गावातील भातशेती, केळी बागायती, नारळाच्या झाडांचे नुकसान करत आहेत.


वन्य प्राणी प्रेमींकडून तिलारी खोऱ्यात हत्तींसाठी राखीव जागा ठेवण्याची मागणी केली जात आहे. हत्तीसाठी अभयारण्य उभारावे अशी मागणी जिल्ह्यातील प्राणीप्रेमीकडून केली जात आहे. गेली अनेक वर्षे तिलारी खोऱ्यात हत्तींचा वावर असल्याने ही मागणी केली जात आहे. कर्नाटकमधून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीत दोडामार्गमध्ये हत्ती येतात. त्याठिकाणी हत्तींना जिल्ह्यात येण्यापासून रोखण्यासाठी सौर कुपन उभारण्याचा प्रस्ताव वनविभागाचा आहे.


Sindhudur Elephant Chasing| सिंधुदुर्गात हत्तीकडून तिघांचा पाठलाग,पुलाच्या पाईपमध्ये लपल्याने बचावले