नांदेड: दक्षिण भारतातील सर्वात मोठी व प्रसिद्ध असणारी श्री क्षेत्र खंडोबाची माळेगाव येथील यात्रा (Malegaon Yatra) कोरोना महामारीमुळे सलग दोन वर्षापासून रद्द करण्यात आली होती. यंदा लॉकडाऊन नसल्यामुळे ही यात्रा होणार अशी अपेक्षा होती.परंतु ओमायक्रोनचे संकट पुढे आले. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी यात्रा रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
दक्षिण भारतातील सर्वात मोठी व प्रसिद्ध असणाऱ्या या यात्रेत घोडे, गाढव, खेचर, माकड, कुत्री, उंट, गाय, बैल, म्हैस अशी देश देशभरातील विविध राज्यातील प्राणी प्रदर्शन व विक्री या यात्रेत दरवर्षी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे देशभरातील पशु प्रेमी शेतकरी याठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. एकूणच या यात्रेस ग्रामीण अर्थकारणाची वर्षानुवर्षाची नाळ जोडली गेली आहे.परंतु ही यात्रा आज रद्द झाल्यामुळे कोटयावधी रुपयांच्या पशु व अश्व खरेदीला मात्र टाच बसली आहे.त्याच प्रमाणे ग्रामीण भागात लोकप्रिय असणाऱ्या लोककला या यात्रेत तुफान गर्दी खेचतात. ज्यात लावणी मोहोत्सव,लोककलावंताचे जसे काळू बाळू, हरिभाऊ बडे,भिका-भीमा, रघुवीर खेडकर,चंद्रकांत ढवळपुरीकर असे विविध फड येतात. पण सलग दोन वर्षांपासून यात्रा रद्द होत असल्यामुळे या लोककलावंतावर आता उपासमारीची वेळ आलीय.
नांदेड जिल्ह्यात सद्यस्थितीत दोन्ही डोस पुर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 32 टक्के आहे. नांदेड जिल्ह्याचा लोकसंख्येच्या प्रमाणात पहिला व दुसरा डोस मिळून कोविड लसीकरणाची सरासरी 67 टक्के झाले आहे. हे प्रमाण संसर्ग रोखण्यासाठी संपुर्णपणे सुरक्षित नाही. लसीकरणाची असलेली टक्केवारी,पर राज्यातून येणारे यात्रेकरू व इतर आरोग्याची वस्तूस्थिती लक्षात घेऊन या स्थितीत कोरोना आजाराचा प्रसार व उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.
इतर महत्वाच्या बातम्या
जुगार अड्ड्यावर धाड, माजी आमदारासह 29 जणांना अटक, सोलापुरातील कारवाईनं खळबळ
Amit Shah Maharashtra Tour : अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर; प्रवरानगरमध्ये देशातील पहिल्या सहकार परिषदेला हजेरी