Pune Junnar Omicron Update : जगभरात चिंतेचा विषय ठरलेल्या ओमायक्रॉननं ग्रामीण महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. जुन्नरमध्ये ओमायक्रॉनचे तब्बल सात नवे रुग्ण समोर आले आहेत. ओमायक्रॉनबाधित सात जणांपैकी पाच जणांनी लशींचे दोन्ही डोस घेतले होते. सातही जण 2 आणि 3 डिसेंबरला यूएईमधून परतले होते. बाधितांच्या संपर्कातील 15 जणांची तपासणी पूर्ण झाली असून अहवालाची प्रतीक्षा आहे. ग्रामीण भागात ओमायक्रॉनने प्रवेश केल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेबरोबरच नगरपालिका प्रशासन अधिक सतर्क झालं आहे.







महाराष्ट्रात शुक्रवारी ओमायक्रॉनच्या आठ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 40 वर पोहोचली आहे.  देशातील सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे, यामधील 25 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. देशातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 109 वर पोहचली आहे.  


काल आढळलेल्या सर्व रुग्णाचे वय 29 ते 45 यादरम्यान आहे. आठ रुग्णापैकी सात जणांना कोणतीही लक्षणं नाहीत. तर एका रुग्णाला सौम्य लक्षणं आहेत. प्राथमिक माहितीनुसार आज आढळलेल्या पुणे येथील चार रुग्णांचा दुबई प्रवास, आणि दोन रुग्ण निकटसहवासित आहेत. मुंबई येथील एका रुग्णांचा अमेरिका प्रवास आणि कल्याण डोंबिवली येथील एका रुग्णांचा नायजेरिया प्रवास आहे. काल आढळलेल्या आठ ओमायक्रॉनबाधित रुग्णापैकी सहा जणांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. तर दोन जण रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.  आज आढळलेल्या आठही रुग्णाचे लसीकरण झालं आहे. या सर्व रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहे.  


राज्यात काल 902 कोरोना रुग्णांची नोंद -
राज्यात काल 902 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 680 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झालाय. राज्यात कालपर्यंत एकूण 64,95,929 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.71% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12% एवढा आहे.