मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्याला वादळी पाऊस आणि गारपिटीचा चांगलाच फटका बसला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे 20 आणि 21 फेब्रुवारीला काही भागात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.


जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि घनसांगवी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. भोकरदन तालुक्यातल्या पारध, रेणुकाई पिंपळगाव गावात रात्रीच्या सुमारास गारा पडल्या. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण आहे. बुलडाणा जिल्ह्यालाही अवकाळी पावसानं झोडपलं आहे. गारपिटीनं गहू आणि हरभऱ्याबरोबरच मोसंबीच्या पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून जालना जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळं फळबागांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जालना : भोकरदन घनसावंगी तालुक्यात गारांचा पाऊस
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन आणि घनसांगवी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण आहे.   गारपिटीनं गहू आणि हरभऱ्याबरोबरच मोसंबीच्या पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून जालना जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळं फळबागांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उरण परिसरावर धुक्याची दाट चादर
रायगड जिल्ह्यातील उरण परिसरावर आज सकाळपासूनच धुक्याची दाट चादर पसरली आहे. यामुळे काही परिसरात 50 ते 60 फुटांच्या अंतरावरचे दिसणे देखील कठीण झाले आहे.  गेल्या काही दिवसांपासून राज्यातील थंडीचा पारा मोठ्या प्रमाणात घसरला आहे. रायगड जिल्ह्यात देखील हा पारा किमान 9 अंशावर गेला होता. दरम्यान आज सकाळपासून उरण परिसरात धुक्याची दाट चादर पसरली आहे. यामुळे, उरण शहर आणि आसपासच्या परिसरातील गावांवर मोठ्या प्रमाणात धुकं दिसून आलं. तर, सकाळपासूनच पसरलेल्या या धुक्यामुळे शाळेत जाणाऱ्या बच्चेकंपनीने मात्र धुक्याचा चांगला आनंद घेतला. तर उरण पनवेल मार्गावर पसरलेल्या धुक्यामुळे 50 ते 60 फूट अंतरावरचे दिसणे देखील कठीण झाल्याने वाहनांचा वेग देखील मंदावला होता. तर, गावांच्या परिसरात पसरलेल्या या धुक्यामुळे गावच्या गाव दिसेनाशी झाली होती.

अमरावती शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस
अमरावती शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात रात्री अवकाळी पाऊस पडला. कालपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळं पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वाशिम: कारंजा तालुक्यात  विजेच्या कडकडाटासह  पाऊस
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात अनेक भागात रात्री 2 वाजता विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे गहू, हरभरा, आंबा, कांदा, संत्रा पिकांचे नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे.

वादळी पावसाची चिन्हं, हवामान तज्ज्ञांचा इशारा
विदर्भ आणि मराठवाड्यातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे 20 आणि 21 फेब्रुवारीला काही भागात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. अमरावती, अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील बऱ्याच भागात या काळात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. यवतमाळ, वर्धा, नागपूर, जालना, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागातही वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. वादळी पावसासोबत काही प्रमाणात गारपीट होण्याचीही शक्यताही व्यक्त केली होती.

या आठवड्यात संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानात वाढ होऊन 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील, असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी या हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करुन शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. वादळी पावसाच्यावेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, मोकळं मैदान, झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणं टाळावं, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.