कल्याण: कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा एक बुरुज ढासळल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे दुर्गाडी किल्ला महापालिकेच्या ताब्यात देण्याचा मागणी महापौरांनी केली आहे.


स्वराज्याच्या आरमाराचं एक केंद्र म्हणून दुर्गाडी किल्ल्याची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या किल्ल्याला भेट दिली होती. विस्तीर्ण खाडी परिसर आणि त्यालाच लागून दुर्गाडी किल्ला उभारण्यात आला होता. पण मागील अनेक दिवसांपासून या किल्ल्याची दुरावस्था समोर येत आहे.

पुरातत्त्व विभागाला या किल्ल्याची डागडूजी करणं सुद्धा जमत नसेल, तर हा किल्ला कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे द्या, अशी मागणी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. ऐतिहासिक नगरी अशी ओळख असणाऱ्या कल्याणमधील दुर्गाडी किल्ला हा एक अमूल्य ठेवा आहे. मात्र, या घटनेनंतर आता तरी पुरातत्त्व विभागाचे डोळे उघडणार का? असा प्रश्न कल्याणकर विचारत आहेत.