मुंबई : नवीन पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना निधी उभारण्यासाठी राज्य सरकारने 3 टोलनाक्यांवर वसुलीचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वांद्रे-वरळी सी लिंक, वाशी आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे या टोलनाक्यांचा समावेश आहे. या टोलनाक्यावर पुढील 29 वर्षे टोलवसुली सुरुच राहणार आहे.


वांद्रे-वर्सोवा सी-लिंकच्या कामासाठी, वांद्रे-वरळी सी लिंकचा टोल 2068 पर्यंत खुला राहणार आहे. खाडीवरील पुलाच्या रुंदीकरणासाठी वाशी टोलनाक्यावर 2038 पर्यंत तर लोणावळा-खंडाळा भुयारी मार्गाच्या कामासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल वसुली 2045 पर्यंत सुरु राहणार आहे.

पायाभूत सुविधांसाठी नेमण्यात आलेल्या उपसमितीने एमएसआरडीला अतिरिक्त टोल वसुलीची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या उपसमितीचे प्रमुख आहेत.

याशिवाय मुंब्रा बायपास (शिळफाटा) ते कल्याणपासून नाशिक महामार्गापर्यंतच्या 30 किमी रस्त्याच्या सहा पदरीकरणालाही मंजुरी देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे नागरिकांना 2016 मध्ये बंद केलेल्या टोलनाक्यांवरही टोल द्यावे लागणार आहे. प्रकल्पांचं 70 टक्के काम पूर्ण झाल्यास टोलवसुली सुरु होईल.

16 किमीच्या टनेल एक्स्प्रेस बायपाससाठी 4800 कोटी रुपये, 12 पदरी वाशी खाडीवरील पुलाच्या रुंदीकरणासाठी 777 कोटी रुपये आणि वांद्रे-वर्सोवा सी लिंकसाठी 7502 रुपये खर्च अपेक्षित आहे.