नवी दिल्ली : राज्यात आणि केंद्रात भाजप सरकार असतानाही महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावर कोणताही तोडगा का काढला जात नाही? असा सवाल खासदार प्रणिती शिंदे यांनी आज संसदेत केला. महाराष्ट्रात सरकार तणाव वाढवत असल्याचा आरोपही खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. संसदेमध्ये आज प्रणिती शिंदे यांनी शून्य प्रहरामध्ये मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच मनोज जरांगे पाटील करत असलेल्या आमरण उपोषणाकडे लक्ष वेधले.
महिला आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी
प्रणिती शिंदे म्हणाल्या की, राज्यात आणि केंद्रामध्ये भाजप सरकार असतानाही कोणताही तोडगा का काढला जात नाही. महिला आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली. दरम्यान, राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये जातनिहाय आरक्षणाची घोषणा केली होती. त्याची आठवण करून देत खासदार प्रणिती शिंदे यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली.
मनोज जरागेंकडून उपोषण स्थगित
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत सुरू केलेले आमरण उपोषण आज स्थगित करण्याचा निर्णय घेतला. नारायणगडाचे मठाधिपती आणि गावातील महिलांच्या हस्ते त्यांनी उपोषण सोडलं. गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आग्रह धरला होता. दरम्यान, आज सकाळीच तब्येत ढासळल्याने मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली होती.
खोटं आणि बेगडी उपोषण मी करणार नाही
यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, मी उपोषण करायला तयार आहे. मात्र, गावकऱ्यांनी उपचार घेण्यासाठी पाणी पिण्यासाठी किंवा सलाईन लावण्यासाठी आग्रह करायचा नाही. विना उपचार घेता आणि सलाईन न लावता मी मरेपर्यंत उपोषण करायला तयार आहे. सलाईन लावून मी उपोषण करायला तयार नाही. खोटं आणि बेगडी उपोषण मी करणार नाही. उपचार बंद करा मी उपोषण करायला तयार आहे, असंही जरांगे यांनी सांगितले. सलाईन लावून पडून राहण्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं असंही जरांगे यांनी नमूद केले.
इतर महत्वाच्या बातम्या