Mamta Kulkarni Drug Case : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीनं (Mamta Kulkarni ) गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेतील कागदपत्रं गहाळ झाल्यानं अखेर हायकोर्टानं ममता कुलकर्णीला दिलासा देऊ केलाय. वर्ष 2016 मध्ये एनडीपीएस कायद्यानुसार ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अभिनेत्री ममता कुलकर्णीनं मुंबई उच्च न्यायालयात वर्ष 2018 मध्ये ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणातील काही कागदपत्रं गहाळ झाल्यानं त्यावर अनेक वर्ष सुनावणी होऊ शकली नव्हती.
न्यायालय प्रशासन गहाळ या कागदपत्रांचा त्यांचा शोध घेत असल्याची माहिती हायकोर्ट रजिस्ट्रारनं न्यायालयाला दिली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी कागदपत्रे आमच्यासमोर ठेवण्यात यावीत आणि दोन्ही पक्षकारांनी निबंधकांना मदत करावी असे निर्देश दिले होते. मात्र ती सादर होऊ न शकल्यानं अखेर न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं ममता कुलकर्णीची याचिका स्वीकारत तिला दिलासा दिला.
काय आहे प्रकरण?
साल 2016 मध्ये ठाणे पोलिसांनी 2 हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामीचं नाव समोर आलं होतं. कल्याणमध्ये 12 एप्रिल रोजी एका नायजेरियन ड्रग पेडलरला अटक केली होती. त्यानं दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातून 2 तरुणांना अटक करण्यात आली. त्या तरुणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुण्यातून मयूर स्वामी नावाच्या फॅक्टरी मॅनेजरला अटक झाली होती. या तपासातून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरच्या 'एव्हॉन लाईफ सायन्स ऑरगॅनिक' या कंपनीवर छापा टाकण्यात आला. तेव्हा तिथून 2 हजार कोटी रुपये किंमतीचं 'एफिड्रिन' हे ड्रग्ज सापडलं होतं.
या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा ममता कुलकर्णीचा पती आणि आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया विकी गोस्वामी असल्याचं स्पष्ट झालं. याप्रकरणात ममता कुलकर्णीविरोधातही पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे सापडल्यानं तिलाही याप्रकरणी आरोपी करण्यात आलं आहे. मात्र या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही असं सांगत तिनं हा गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ममता कुलकर्णी आणि तिचा पती हे गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात पसार झाले असून ते परत कधीही भारतात आलेले नाहीत.
ममता कुलकर्णी हिने अनेक हिंदी सिनेमांत काम केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून ती सिनेसृष्टीपासून दूर आहे. 'करण अर्जुन', 'कभी तुम, कभी हम', 'गँगस्टर', 'तिरंगा', 'दिलबर', 'वक्त हमारा है', 'भूकंप', 'सबसे बडा खिलाडी' अशा अनेक सिनेमांत ममताने अभिनेत्री म्हणून काम केले आहे.