नांदेड : नांदेडमध्ये एका फरार आरोपीनं थेट पोलिसांवरच तलवारीने हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या आरोपीचं नाव संतोष धुतराज असून पॅरोलवर असताना तो फरार झाला होता.


फरार आरोपी संतोष धुतराज काही दिवसांपूर्वीच पॅरोलवर सुटून जेलबाहेर आला होता. मात्र, पॅरोल संपल्यावरही तो जेलमध्ये परतला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला फरार घोषित करुन त्याचा शोध सुरु केला.

आरोपी संतोष नांदेडमधील तळणी गावात असल्याची बातमी पोलिसांना समजल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस तिकडे रवाना झाले. त्याचवेळी संतोषनं पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. यावेळी पोलिसांनी देखील बचावासाठी गोळीबार केला. त्यात तो जखमी झाला असून सध्या त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, आरोपी संतोष धुतराज याच्यावर अनेक गुन्हे नोंद असून तो पॅरोलवर जेल बाहेर होता.