Vamandada Kardak Sahitya Sammelan : महाकवी, गीतकार वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दनिमित्त एक दिवसीय वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (23 एप्रिल) बुलढाण्यात वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलन होणार आहे. चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिली. वामनदादांच्या नावानं आयोजित केलेलं हे पहिलंच साहित्यसंमलेन असून ते ऐतिहासीक ठरेल, असा विश्वास तुपकर यांनी व्यक्त केला.
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक अर्जून डांगळे हे राहणार आहेत. यावेळी मुख्य निमंत्रक मंत्रालयीन सचिव सिद्धार्थ खरात, प्रसिद्ध साहित्यिक प्रा. सदानंद देशमुख, कार्याध्यक्ष माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप जाधव व स्वागताध्यक्ष रविकांत तुपकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार असून तत्पूर्वी ग्रंथ प्रदर्शनी व विक्री स्टॉलचे उद्घाटन केले जाणार आहे.
दरम्यान, दहा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर संमेलनाच्या पहिल्या सत्रात साडेबारा ते दीड यावेळेत वामनदादा कर्डक राज्यस्तरीय गायन स्पर्धेतील विजेत्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. दीड ते तीन यावेळात वामनदादा परिसंवादाचे दुसरे सत्र होणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. महेंद्र भवरे हे राहणार असून वामनदादांच्या काव्यातील वैश्विक जाणिवा या विषयावर डॉ. उत्तम अंभोरे औरंगाबाद, वामनदादांच्या गझल रचना या विषयावर डॉ. प्रमोद वाळके आणि वामनदादांच्या काव्यातील प्रतिभा या विषयावर प्रा. डॉ. प्रतिभा वाघमारे - खोब्रागडे या सहभागी होणार आहेत. तिसऱ्या सत्रात मी पाहिलेले, वाचलेले वामनदादा या विषयावर आधारीत टॉक शो होणार आहे. यामध्ये प्रा. डॉ. श्रीधर अंभोरे जालना, प्रा. डॉ. दिलीप महालिंगे औरंगाबाद, माधवराव गायकवाड अहमदनगर, भाई अशांत वानखेडे, प्राचार्य डॉ. अविनाश मेश्राम हे सहभागी होणार आहेत. चौथ्या सत्रात निमंत्रीतांचे कवी संमेलन होणार आहे. साडेपाच ते सात या वेळात समारोप सत्राचा कार्यक्रम होणार आहे. तर रात्री सात वाजता ही रात्र शाहिरांची हा कार्यक्रम होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Marathi Sahitya Sammelan : आजपासून उदगीरमध्ये साहित्यिकांचा मेळा; तीन दिवसांच्या साहित्य संमेलनात विविध कार्यक्रमांची लयलूट
- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सूर्यनमस्काराचा नवा विक्रम, गिनिज बुक ऑफ रेकॉर्डसह ऑलिंपिया रेकॉर्डमध्ये नोंद