अकोला : अॅड. प्रकाश आंबेडकरांनी आपल्या वंचित बहूजन आघाडीचा पाचवा उमेदवार जाहीर केला आहे. अमरावतीत झालेल्या सभेत गुणवंत देवपारे यांच्या नावाची घोषणा त्यांनी केली आहे. आतापर्यंत बुलडाण्यातून आमदार बळीराम सिरस्कार, नांदेडमधून प्रा. यशपाल भिंगे, यवतमाळमधून प्रा. प्रविण पवार, माढ्यातून अॅड. विजय मोरे यांची नावे लोकसभेसाठी जाहीर केली आहेत. अॅड. प्रकाश आंबेडकर असेच उमेदवार जाहीर करत राहिले तर आघाडीचा गुंता कसा सुटणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. शिवाय हे आंबेडकरांचं दबावतंत्र असल्याचंही बोललं जातं आहे.
कालच्या अमरावतीला वंचित बहुजन आघाडीची सभेत प्रकाश आंबेडकरांनी आपल्या आघाडीचा लोकसभेचा पाचवा उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेस आणि आंबेडकर ह्यांची आघाडीची घडी बसणार असे चित्र दिसत होते. मात्र प्रकाश आंबेडकर आपला एक-एक उमेदवार असाच जाहीर करत राहिले तर संभाव्य आघाडीचं त्रांगडं कसं सुटणार हा सवाल उपस्थित होत आहे.
आंबेडकरांनी एमआयएमला सोबत घेत वंचित बहुजन आघाडीची मोट बांधली आहे. राज्यात औरंगाबादपासून एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना सोबत घेत औरंगाबाद, सोलापूर, नांदेड, अमरावतीत जंगी सभा घेतल्या आहेत. एमआयएम आंबेडकरांसोबत असल्यानं काँग्रेसनं आंबेडकरांसोबतच्या प्रस्तावित आघाडीत अडचणी येत असल्याचं अनेकदा स्पष्ट केलं आहे. नांदेडच्या सभेत एमआयएमनं आंबेडकरांसाठी वंचित आघाडीतून बाजूला होण्याची तयारी दर्शविली आहे. काँग्रेसनं त्यानंतर आघाडीची मोठी अडचण दूर होणार असल्याचं सांगत आंबेडकरांना सोबत घेण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, काल अमरावतीत आंबेडकरांनी पाचवा उमेदवार जाहीर करीत आघाडीच्या शक्यता धूसर असल्याचे संकेत दिले आहेत.
वंचित बहूजन आघाडीनं लोकसभेसाठी जाहीर केलेले उमेदवार
१) बुलडाणा : आमदार बळीराम सिरस्कार
२) अमरावती (राखीव - अनुसुचित जाती) : गुणवंत देवपारे
३) नांदेड : प्रा. यशपाल भिंगे
४) यवतमाळ-वाशीम : प्रा. प्रविण पवार
५) माढा : अॅड. विजय मोरे
प्रकाश आंबेडकरांचं दबावतंत्र, वंचित बहुजन आघाडीचा पाचवा उमेदवार जाहीर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Feb 2019 09:15 AM (IST)
अॅड. प्रकाश आंबेडकर असेच उमेदवार जाहीर करत राहिले तर आघाडीचा गुंता कसा सुटणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. शिवाय हे आंबेडकरांचं दबावतंत्र असल्याचंही बोललं जातं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -