अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांनीच सहाय्यक फौजदारावर गुन्हा दाखल केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. कर्तव्यात कसूर करण्यासारख्या अनेक आरोपाखाली सहाय्यक फौजदार प्रशांत मिसाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना चाप बसणार आहे.

सध्या श्रीरामपूर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहाय्यक फौजदार प्रशांत मिसाळ हे 2012 पर्यंत कोपरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव पोलीस ठाण्यात तब्बल 27 गुन्हयांचा तपास रेंगाळला आहे. वारंवार लेखी आणि तोंडी सूचना देवूनही गुन्ह्याचा तपास मिसाळ यांनी केला नाही, असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

त्यामुळे संबंधित गुन्हयातील आरोपींना त्याचा फायदा पोहोचला आहे. कायदेशीर कर्तव्यात कसूर करणे , गुन्हयाची तीव्रता कमी करणे, पुरावा नष्ट करणे, जुगार अड्ड्यांवरील छापेमारीत जप्त केलेला मुद्देमाल स्वतच्या फायद्यासाठी वापरणे, अशा आरोपांवरुन कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी मिसाळ यांच्यावर स्वत फिर्याद दाखल केली आहे.

कलम 188, 217, 218 तसेच 409 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनीच पोलिसावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.