कोल्हापूर : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातून पुजारी हटवण्याच्या मागणीसाठी भक्तांनी जोरदार निदर्शनं केली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटी झाल्यानं मंदिरात काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर पोलिसांनी पुजाऱ्यांना गाभाऱ्यातून बाहेर जाण्याची विनवणी केली, पोलिसांची ही विनंती मान्य करत गाभारा सोडल्यानंर आंदोलक शांत झाले.


पुजारी हे मंदिराचे नोकर आहेत, असा शाहू महाराजांच्या जुना वटहुकूमाचा दाखला देत भक्तांनी पुजाऱ्यांना हटवण्याची मागणी केली. मात्र पुजाऱ्यांनी त्या वटहुकुमाचा 'तथाकथित' असा उल्लेख केल्यामुळं शाहु प्रेमी संतापले असून त्यांनी पुजाऱ्यांविरोधात आंदोलन छेडलं आहे.

ज्याप्रमाणे पंढरपुरातील विठ्ठल मंदिर बडवेमुक्त करण्यात आलं, त्याचप्रमाणे अंबाबाईचं मंदिर पुजारीमुक्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, आगामी काळात पुजाऱ्यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.