धुळे : चिमुकलं बाळ रडायला लागलं की आई अंगाई गाऊन त्याला शांत करते आणि झोपवते, असं चित्र आपण अनेक वेळा पाहतो. मात्र रडत असलेलं बाळ शांत होत नसल्याचं बघून चक्क एका बालरोगतज्ज्ञांनी गायलेलं गाणं ऐकून बाळ शांत झोपी गेल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंगाई गाणारे हे डॉक्टर धुळे शहरातील असून सध्या त्यांच्या नावाची जोरात चर्चा सुरु आहे


धुळे शहरातील संगोपन बाल रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉक्टर अभिनय दरवडे यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या एका बाळाचे वजन अवघे 900 ग्रॅम भरले होते. हे बाळ बचावण्याची शक्यता धूसर झाली होती, मात्र डॉक्टर अभिनय दरवडे यांनी योग्य ते उपचार केल्याने बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली.


या बाळाने जन्मल्यापासून एकदाही दूध प्यायलं नव्हतं. परंतु नंतर पोटभर दूध प्यायल्यानंतर या बाळाला ताकद आली आणि बाळाने जोरदार रडण्यास सुरुवात केली. काहीही केल्या हे बाळ शांत होत नसल्याचे बघून डॉक्टर अभिनव दरवडे यांनी बाळाला आपल्या केबिनमध्ये आणलं. यानंतर त्यांनी आपल्या गोड आवाजात बाळासाठी काही गाणी गाण्यास सुरुवात केली. तीन ते चार गाणी ऐकल्यानंतर बराच वेळ रडत असलेले हे बाळ शांत होत झोपी गेलं.


आईने अंगाई गायल्यानंतर शांत झोपी गेलेले बाळ आपण नेहमीच पाहतो, मात्र धुळ्यातील डॉक्टरांनी गाणं गायल्यानंतर हे बाळ शांत झोपी गेल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. डॉक्टर अभिनय दरवडे यांनी देखील फेसबुकवर या व्हिडीओ शेअर केला आहे.