मुंबई : राज्यातील सध्याची परिस्थिती अतिशय भयावह आहे. मला दररोज शेकडो फोन येत आहेत. यासोबतच कोरोना बाधित रुग्णांचे सध्या प्रचंड हाल होतं आहेत. सध्या विविध ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या रुग्णालयांचं भविष्य काय ? ते मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसात टिकणार का असे अनेक सवाल मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपस्थित केले. आज अमित ठाकरे यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाचे अंतिम वर्षाचे शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांप्रश्नी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीवेळी अमित ठाकरे यांनी राज्यपालांसोबत विद्यार्थ्यांच्या प्रश्नी चर्चा केली.
याबाबत बोलताना मनसे नेते अमित ठाकरे म्हणाले की, सध्या अंतिम वर्षाचे वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या मुलांचे प्रचंड हाल होतं आहेत. सध्या ही सर्व मुलं सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशावर ओढवलेल्या कोव्हीड-19 च्या रुग्णांची सेवा करण्यात व्यस्थ आहेत. या रुग्णांची सेवा करण्यासाठी हे सर्व डॉक्टर जवळपास 14 ते 15 तास रुग्णालयांमध्ये व्यस्थ असतात. अशा परिस्थितीत ते आपल्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा अभ्यास कसा करणार ? यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळणं गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सध्याची परिस्थिती वैद्यकीय शिक्षण मंडळाने लक्षात घ्यायला हवी. यामध्ये विद्यार्थ्याना दिलासा देणारा निर्णय शासनाने घेणं महत्त्वाचं आहे. यासाठी शासनाने एकतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द कराव्या किंवा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ द्यावा. या परीक्षा खुप कठीण असतात निदान अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळाला तर विद्यार्थी परीक्षा तणावाखाली न राहता देऊ शकतील आणि पास देखील होतील. जर परीक्षा रद्द केल्या तर विद्यार्थ्याच्या मागील सत्रांच्या गुणांचा विचार करून त्यांना गुणांकन द्यावं.
सध्या महाराष्ट्रावर ओढवलेली परिस्थिती आणखी किती दिवस चालेल माहिती नाही. याच्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना ताण न देता तत्काळ योग्य तो निर्णय घ्यावा. काही दिवसांपूर्वी मला भेटण्यासाठी वैद्यकीय शिक्षण घेणारे अंतिम वर्षातील विद्यार्थी आले होते. त्यांनी मला या त्यांच्या व्यथा सांगितल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकल्या नंतर मी प्रथम वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेटण्याची वेळ मागितली होती. परंतु ते लातूरला असल्यामुळे भेट होऊ शकली नाही. त्यानंतर मी राज्यपालांना भेटीसाठी वेळ मागितली आणि आज भेटण्यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर यांना घेऊन आलो आहे.
यासोबतच राज्यातील सध्याची परिस्थिती आणि सरकारच्या उपाय योजना यावर बोलताना अमित ठाकरे यांनी जोरदार टीका केली. सध्या महाराष्ट्र राज्यातील परिस्थिती खूपच भयावह झाली आहे. मला स्वतःला दररोज हजारो तक्रारींचे फोन येतं आहेत. सध्या रुग्णांना तक्रार करण्यासाठी जो नंबर देण्यात आलेला आहे तो देखील उचलला जात नसल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे. यावर शासनाने तत्काळ उपाययोजना करायला हव्यात. सध्या मुंबईत तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या कोव्हिड-19 रुग्णालये पावसाळ्यात किती टिकतील याबाबत देखील काही माहिती नाही. त्यामुळे हाताबाहेर जात असलेली परिस्थिती तत्काळ थांबवण्यासाठी तत्काळ उपाययोजना करायला हव्यात. यासाठी दूरदृष्टीकोन ठेवायला हवा. अन्यथा निर्माण होणाऱ्या परिस्थितीला शासनचं जबाबदार असेल.