पालघर : पावसाचा जोर वाढल्यामुळे वसईतील चिंचोटी धबधब्यावर पोहायला गेलेले पर्यटक वरतीच अडकले. यातील सर्व 20 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र दुर्दैवाने एक जणाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. धोकादायक ठिकाणी असलेल्या यापैकी पाच जणांना हेलीकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. तर पाण्याचा वेग कमी झाल्यानंतर काही जण बाहेर पडले. चिंचोटी धबधब्यावर पायी जाण्यासाठी दोन तास लागतात. त्यामुळे वसईच्या तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हेलिकॉप्टरची मागणी केली. या सर्वांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली. ठाणे जिल्ह्यात मुसळधार, मध्य रेल्वेवर परिणाम कोकणासह ठाणे पालघर जिल्ह्यात कोसळणाऱ्या तुफान पावसामुळे अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला आहे. कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील वाशिंद येथील बोगदा पाण्याखाली गेल्याने तब्बल 42 गावांचा संपर्क तुटला आहे. वाशिंद पूर्व आणि वाशिंद पश्चिम यांना जोडणारा 42 गावातील गावकऱ्यांना शहराशी जोडणारा एकमेव पर्याय आहे. गावकऱ्यांना या रेल्वेच्या बोगद्यातून शहराच्या ठिकाणी ये जा करावी लागत आहे. रेल्वेच्या बोगद्यातील पावसाचे पाणी ओसरण्यासाठी किमान 4 ते 5 तास लागणार असल्याचं बोललं जात आहे. पालघर जिल्ह्यात नद्यांना पूर, जनजीवन विस्कळीत पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून जव्हार-विक्रमगड रोडवरील साखरे पुलावर पाणी आलं आहे. त्यामुळे नाशिक आणि जव्हारवरुन विक्रमगड आणि पालघरकडे जाणारी वाहतूक बंद आहे.
देहर्जे नदीला मोठा पूर आल्यामुळे कुर्झे येथील पुलावर पाणी आलं आहे. या पुलावरुन विद्यार्थी धोकादायक प्रवास करत आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे रस्ते बंद होण्याची वेळ आली असून अजूनही पावसाचा जोर कायम आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातील नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. आंबेरी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे 27 गावांचा संपर्क तुटून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कोकणात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. नागपुरात तब्बल 24 वर्षांनी एवढा पाऊस अधिवेशनाचा कालचा दिवस पाण्यात घातल्यानंतर नागपूरसह विदर्भावर पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचं सावट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  खबरदारी म्हणून आज नागपुरातल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागपुरात रात्री पावसाने विश्रांती घेतली असली तरी सकाळपासून थांबून-थांबून हलका पाऊस होतोय. दरम्यान, सकाळपासून सुरु झालेल्या पावसामुळे रामटेक भागातल्या पिडंकेपार गावात वीज कोसळली. यात दोन जणांचा मृत्यू झाला. हर्षल चनेकार आणि नागेश्वर मोहुले अशी मृतांची नावं आहेत. याआधी तब्बल 24 वर्षांपूर्वी म्हणजे 1994 साली नागपुरात इतका मोठा पाऊस झाला होता.