अहमदनगर : केडगावमधील दोन शिवसैनिकांच्या हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जामीन मंजूर झाला आहे. जगताप आणि बाळासाहेब कोतकर यांना अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.


प्रत्येकी 15 हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर आणि तपासात सहकार्य करणे आणि साक्षीदार-फिर्यादीवर दबाव न टाकण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

जगताप सध्या नाशिक कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. जामीन मिळाल्यानंतर जगताप आज कारागृहातून सुटण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी शुक्रवारी सीआयडीने जिल्हा सत्र न्यायालयात दहा आरोपींपैकी आठ जणांवर आरोपपत्र सादर केलं होतं. या आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि बाळासाहेब कोतकर यांना तात्पुरता दिलासा मिळाला. आरोपपत्रात दोघांचा समावेश नव्हता.

तपासात निष्पन्न झाल्यास पुरवणी आरोपपत्रात दोघांची नावं समावेश होण्याची तरतूद करण्यात आली असल्याने संग्राम जगताप यांच्यावर टांगती तलवार कायम आहे. तर भानुदास कोतकर, संदीप गुंजाळ, विशाल कोतकर, रवींद्र खोल्लम, बाबासाहेब केदार, भानुदास महादेव कोतकर, संदीप गिऱ्हे आणि महावीर मोकळ यांच्या नावाचा आरोपपत्रात समावेश आहे.

हत्या आणि हत्याचा कट, आर्म अॅक्टसह आरोपपत्र दाखल करण्यात आलं.

काय आहे प्रकरण?

केडगाव शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची सात एप्रिलला गोळ्या झाडून आणि गुप्तीने गळा चिरुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या राजकीय वादातून ही हत्या झाली होती. संदीप गुंजाळसह चौघांनी हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी गुंजाळला अटक करण्यात आली होती.

तपासासाठी पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली होती. मात्र मृतांच्या कुटुंबीयांनी पोलीस तपासावर आक्षेप घेतल्याने तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला.

हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, वडील आमदार अरुण जगताप आणि सासरे भाजप आमदार शिवाजी कर्डिले, व्याही भानुदास कोतकर, संदीप कोतकर आणि विशाल कोतकरसह 36 जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्या, हत्येच्या कटासह इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी आमदार संग्राम जगतापसह दहा जण न्यायालयीन कोठडीत आहेत. संदीप गुंजाळ, भानुदास कोतकर, बाळासाहेब कोतकर, बी एम कोतकर, रवी खोल्लम, संदिप गिर्‍हे, महावीर मोकळ, विशाल कोतकर आणि बाबासाहेब केदार न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र या प्रकरणी आमदार अरुण जगताप यांना अद्याप अटक झाली नसून ते फरार आहेत.

महापालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विशाल कोतकर निवडून आला होता. मात्र सायंकाळी दोघा शिवसैनिकांची निर्घृणपणे हत्या झाली. यानंतर शिवसैनिकांनी केडगावला रस्ता रोको आंदोलन करुन मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह घटनास्थळीच होते.

यानंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशी करण्यात आली. यावेळी जमावाने एसपी कार्यालयाची तोडफोड करुन संग्राम जगताप यांना घेऊन गेले होते.

या प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली होती.