ठाणे : सरकारी अधिकारी काही पैशांसाठी सर्वसामान्यांना वेठीस धरत असल्याच्या प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. असाच आणखी एक प्रकार कल्याणात उघडकीला आला आहे. अतिवृष्टीमुळे गाळे पाण्याखाली गेल्यामुळे झालेल्या नुकसानाचा मोबदला मिळवून देण्यासाठी महिला तलाठीने पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती. तेच पंधरा हजार घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका खाजगी व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणी लाच मागणारी तलाठी अमृता बडगुजर फरार आहे. 


अनंता कंटे असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून तो या महिला तलाठीसाठी काम करायचा. या प्रकरणात तलाठी अमृता बडगुजर यांनासुद्धा आरोपी करण्यात आले असून त्या फरार आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.  


कल्याण तालुक्यातील कांबा परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आणि दुकानदारांचे नुकसान झाले होते. सरकारकडून या ठिकाणी पंचनामे केले होते. कल्याण तहसील कार्यालयाने हे पंचनामे केले होते. ज्या लोकांचे नुकसान झाले होते त्यांना मोबदला देण्यात आला. कांबा परिसरातील एका व्यक्तीच्या गाळ्याचे नुकसान झाले. या व्यक्तीला पंचनाम्यानंतर मोबदला मंजूर झाला. हा मोबदला मिळवून देण्याच्या बदल्यात कल्याण तहसील कार्यालयातील महिला तलाठीने त्याच्याकडे पंधरा हजार रुपये मागितले होते. 


या पैशाची तडजोड कांबा येथे राहणाऱ्या अनंत कंटे या व्यक्तीने केली होती. कंटे हा कल्याण पश्चिमेतील तलाठी कार्यालयात काम करतो. तो एक खाजगी इसम आहे. तो सरकारी कामात मध्यस्थी करतो. याबाबत तक्रारदार कंटे यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाला ही माहिती दिली होती .ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज कार्यालयात सापळा रचला आणि चिकणघर येथील तलाठी कार्यालयात पंधरा हजार रुपये घेताना अनंत कंटे याला ताब्यात घेतले. कंटे याने महिला तलाठी अमृता बडगुजर यांच्यासाठी पैसे मागितल्याचे निष्पन्न झालंय. एसीबीने कंटेला ताब्यात घेत अमृता बडगुजर यांचा शोध सुरु केला आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -