मुंबईपाठोपाठ ठाण्याच्या महापौरपदाच्या शर्यतीतून भाजपने सकाळीच माघार घेतली होती. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं ठाणे भाजपचे अध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितलं.
भाजपकडून आशा सिंह आणि मुकेश मोकाशी यांनी भरलेला अर्ज मागे घेतला. महापौरपदासाठी राष्ट्रवादीनेही अर्ज भरला होता, मात्र भाजपपाठोपाठ राष्ट्रवादीनेही माघार घेतली. विशेष म्हणजे अवघ्या 3 जागा असणाऱ्या काँग्रेसच्या वतीनं विक्रांत चव्हाणांनी अर्ज दाखल केला होता.
ठाण्यात 131 पैकी 67 जागा मिळवत शिवसेनेनं वर्चस्व मिळवलं आहे, तर राष्ट्रवादीच्या 34 आणि भाजपच्या 23 जागा निवडून आल्या आहेत.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. त्याची तयारी म्हणून ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील चौकात भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. तसंच पालिकेच्या प्रवेशद्वारावरच हत्तीही उभे करण्यात आले असून पालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळाही उभारण्यात आला आहे.