मुंबई : राज्यात भाजप हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करत असून याचा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. ते अबंरनाथमध्ये बोलत होते. अंबरनाथ नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा आदेश त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "अमरावतीत जो काही प्रकार घडला, त्यात भाजपचे माजी मंत्री आणि त्यांचे 25-26 कार्यकर्ते वाद निर्माण करताना सापडले. त्यामुळे भाजप राज्यात हिंदू मुस्लिम वाद निर्माण करत असून उत्तर प्रदेश निवडणुकीत याचा फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, मात्र आम्ही जनतेला शांत राहण्याचं आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र शांत झाला."


एसटी कामगारांच्या आंदोलनावरूनही पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. एसटी कामगारांच्या आंदोलनामागे भाजपचे नेते आहेत हे आता उघड झालं आहे असं सांगत एसटी कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्यातलं वातावरण भाजपकडून गढूळ केलं जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. राज्य सरकार एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून हा प्रश्न एका दिवसात सुटणारा नाही. एसटी कामगारांना न्याय नक्की मिळेल, पण त्यांनी आंदोलन मागे घ्यावं, कारण संपामुळे त्यांचं नुकसान होईल, असं आवाहन पटोले यांनी केलं.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बदलापूरचा दौरा संपवल्यानंतर अंबरनाथ शहराचा दौरा केला. यावेळी उलन चाळ परिसरातून त्यांनी पदयात्रा काढली. त्यानंतर महात्मा गांधी विद्यालयात त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेत कार्यकर्त्यांना संबोधित केलं. या मेळाव्यात काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी शहरात काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर काँग्रेस पक्ष स्थानिक पातळीवरचे निर्णय स्थानिक पातळीवरच घेत असून इथल्या कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आपण स्वबळावर निवडणूक लढवण्याचे आदेश देत असल्याचं नाना पटोले यांनी जाहीर केलं. या कार्यकर्ता मेळाव्याला अंबरनाथ शहरातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तुफान गर्दी केली होती. नाना पटोले यांच्या आदेशानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत काय निर्णय घेतात, हे पाहावं लागणार आहे.


संबंधित बातम्या :