मुंबई : राज्यात आज जवळपास 3 लाख 43, हजार 364 विद्यार्थ्यांनी टीईटीची परीक्षा दिली. या परीक्षेत गंभीर चुका असल्याची बाब आता समोर आली आहे. यंदा पेपरमध्ये योग्य जोड्या जुळवा, असा प्रश्न देण्यात आला होता. मात्र रकाण्यांमध्ये वेगळेच पर्याय देण्यात आले होते. तसेच वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती, असा प्रश्न विचारण्यात आला, मात्र वाक्याखाली अंडरलाईन करण्यात आलेलीच नव्हती.

याशिवाय आजच्या टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत असे अनेक चुकीचे प्रश्न होते. या संपूर्ण प्रकरणातील धक्कादायक बाब अशी की, दोन्ही पेपरमध्ये शुद्धलेखनाच्या गंभीर चुका आहेत. त्यामुळे आता विद्यार्थी वर्गात नाराजी पसरली आहे. विद्यार्थ्यांकडून आता या चुकीच्या प्रश्नांचे गुण आम्हाला मिळावेत, अशी मागणी केली जात आहे.

मागील वर्षी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेतही प्रश्नपत्रिकेत अशा चुका असल्याचं समोर आलं होतं. परंतु त्यावेळी विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले नव्हते. परंतु यावर्षी जर गुण देण्यात आले नाही, तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा शिक्षकभारती संघटनेनं दिला आहे. आत्तापर्यंत राज्यात 7 वेळा टीईटीची परीक्षा झालेली आहे. मात्र भरती प्रक्रिया अद्याप राबवण्यात आलेली नाही. राज्यात जवळपास दीड लाख शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.



वर्धा आणि हिंगोलीत परीक्षा केंद्रांवर गोंधळ



टीई़टी परीक्षेला वर्धा आणि हिंगोलील काही केंद्रांवर विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वर्ध्यात टीईटी परीक्षेच्या दुसऱ्या पेपरला न्यू इंग्लिश केंद्रावर काही विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला नाही. विद्यार्थ्यांना येण्यास उशीर झाल्याचं कारण त्यासाठी देण्यात आलं. मात्र आम्ही वेळेत आल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.हिंगोली शहरातील एकूण बारा परीक्षा केंद्रावर दोन सत्रात टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली आहे. तेथेही उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. आदर्श महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावर सकाळी 10.10 वाजता गेट बंद करण्यात आला. त्यामुळे 20 ते 25 विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने त्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलं. टीईटी परीक्षेसाठी आलेल्या भावी शिक्षकांनी जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाकडे विनंती करून देखील प्रवेश न मिळाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.



संबंधित बातम्या