बीड : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) च्या पेपरमध्ये 40 पेक्षा जास्त शुद्ध लेखनाच्या चुका आढळून आल्या. त्यामुळे नेमकं लिहायचं काय, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला.


टीईटीच्या पेपर क्रमांक दोनमधील 'C' संचातील प्रश्नपत्रिकेतील प्रश्नामध्ये तब्बल 40 पेक्षा जास्त शुध्द लेखनाच्या चुका आढळून आल्या. त्यामुळे विचारलेल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय द्यायचं, असा प्रश्न विद्यांर्थ्यांसमोर पडला.

राज्य सरकारने शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट घातली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत ही 150 गुणांची परीक्षा 2012-13 पासून घेण्यात येते.

शनिवारी राज्यभरात परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. परीक्षा दोन सत्रात घेण्यात आली. डी.एड. साठीचा पेपर सकाळच्या, तर बी. एड. चा पेपर दुपारच्या सत्रात घेण्यात आला. यामध्ये दुपारच्या सत्रातील पेपरमधील सी संचातील प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या प्रश्नात शुध्द लेखनाच्या अनेक चुका आढळून आल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.

शिक्षकांची परीक्षा घेणाऱ्यांकडूनच जर शुध्द लेखण्याचा चुका होत असतील तर परीक्षा देणारे काय अचूक उत्तरे लिहितील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.