मुंबई: त्वचा उजळ करण्याचा दावा करणाऱ्या लॉरिएल कंपनीच्या उत्पादनांमध्ये पारा आढळल्याने कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने लॉरिएलच्या उत्पादनांची तपासणी केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
फेसक्रीममध्ये पारा असल्यास मूत्रपिंड निकामी होण्यासोबतच त्वचेसंबंधी आजार होण्याची शक्यता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले होते. डब्ल्यूएचओच्या या माहितीनंतर लॉरिएल कंपनी अडचणीत सापडली आहे.
लॉरिएलच्या गार्नियर मेन पॉवर लाइट इंटेन्सिव्ह फेअरनेस फेसवॉश, गार्नियर मेन पॉवर लाइट स्वेट प्लस ऑइल कंट्रोल फेअरनेस मॉइश्चराइजर, लॉरिएल पर्ल परफेक्ट फेअरनेस क्रिम (नाईट), लॉरिएल परफेक्ट फेअरनेस प्लस मॉइश्चराइजिंग क्रिम (डे) आणि लॉरिएल पर्ल परफेक्ट रि लायटनिंग व्हाईटिंग फोम या पाच उत्पादनांमध्ये पारा आढळला आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, लॉरिएल कंपनीच्या चाकणमधील प्रकल्पातून अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नमुने घेतले होते. यातील पाच नमुन्यांमध्ये पाऱ्याचे प्रमाण 0.5 पार्टस् पर मिलीयन (पीपीएम). 1.02 पीपीएम, 1.69 पीपीएम, 1.87 पीपीएम, 2.38 पीपीएम ऐवढे असल्याचे आढळल्याचे सांगण्यात आले होते. याला अन्न आणि औषध विभागाचे आयुक्तांनाही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
एप्रिलसमध्ये या क्रीमचे उत्पादन झाले होते. भारतातील औषध आणि सौंदर्य उत्पादन नियमावली 1945 नुसार पारा असलेल्या सौंदर्य उत्पादन तयार करण्यावर बंदी घातली. विशेष म्हणजे राज्यातील एफडीएच्या तपासणीत पाऱ्याचे प्रमाण जास्त आढळले, तर फ्रान्समध्ये लॉरिएलच्या उत्पादनात पाऱ्याचे प्रमाण हे नोंदही घेता येत नव्हते इतक्या प्रमाणात आढळले होते.
दरम्यान, महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचा एप्रिल 2016 मधील अहवाल फ्रान्स, जर्मनी, जपान आणि सिंगापूर या देशांमधील तपासणी अहवालापेक्षा वेगळा आहे. या सर्व देशांमध्ये आमच्या उत्पादनांमध्ये पाऱ्याचे प्रमाण नोंद घेण्याइतपतही नव्हते, असा दावा कंपनीच्या प्रवक्त्यांनी केला आहे.
गेल्या सात वर्षात लॉरिएलच्या विक्रीत भरभरुन वाढ झाली असून 2020 पर्यंत 15 कोटी भारतीयांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दीष्ट आहे.