अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळमधील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना पाकिस्तानला चांगलेच फैलावर घेतले. उरी हल्ल्यातील शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे त्यांनी यावेळी देशवासियांना सांगितले. यावरुन भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधानांच्या पाकिस्तानविषयक भूमिकेचे स्वागत करतानाच फक्त इशारे देऊन भागणार नाही, ठोस कृतीची गरज असल्याचे मत व्यक्त केलं. त्यांनी यावेळी बोलताना पाकिस्तान म्हणजे 'लातो के भुत बातो से नही मानते' असंही सांगितलं.
यासोबत सावंत यांनी आमदार आशिष शेलार आणि खासदार किरीट सोमय्या यांच्यावरही टीकेची झोड उठवली. या दोघांचीही नावे न घेता, त्यांचे बोलविते धनी दुसरेच असल्याचं सांगतलं. तसेच लायकी नसणाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी युती तोडण्याची घोषणा केली, अशी टीका सावंत यांनी यावेळी केली.