सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचा भाजपला फायदा होत असल्याचा आरोप करत बाहेर पडलेले लक्ष्मण माने शिवसेनेसोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत. प्रबोधनकार ठाकरे आमचे गुरु असल्याचे म्हणत शिवसेनेसोबत जाण्याची इच्छा त्यांनी सोलापूरात व्यक्त केली.


"प्रबोधनकारांच्या पोराने चूक केली, मात्र नातवंडं सुधारत असतील तर मातोश्रीवर दिसायला वावडं वाटणार नाही", असं विधान महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी केलं आहे. आमचा लढा हा भाजप विरोधात असून आम्ही एक वेळ शिवसेनेसोबत बोलणी करु. भाजप आणि शिवसेना वेगवेगळे पक्ष आहेत, असं म्हणत शिवसेनेसोबत जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.



यावेळी माने यांनी संघ आणि भाजपवर निशाणा साधला. "आमचा लढा हा भाजप विरोधात असून, आमचा अजेंडा भाजप भगाओ आहे. भाजपच्या मागे आरएसएस असून ही अतिरेक्यांची संघटना आहे", असा घणाघात लक्ष्मण माने यांनी केला.


दिवसेंदिवस देशाची आर्थिक स्थिती बिघडत चालली आहे. रुपयाचे मूल्य घसरत आहे. त्यामुळे देशातील उद्योगात कमालीची घट होत आहे. तरीदेखील देशा सुव्यवस्थेत चालतो आहे, अशा अविर्भावात भाजपा सरकारमधील नेते वावरत आहेत. वेळीच हे सरकार खाली खेचले नाही तर देशाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या विधानसभेत लोकांनी लोकशाही वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन देखील लक्ष्मण माने यांनी केलं.