सांगली : दहावीची परीक्षा देऊन परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तवेरा गाडीचा सांगली-तासगाव रोडवरील कुमठे फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. विद्यार्थ्यांच्या गाडीला एका माल वाहतूक करणाऱ्या गाडीने जोरदार धडक दिली. यामध्ये गाडीचा चालक ठार झाला असून पाच विद्यार्थ्यांसह नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सांगलीच्या तासगाव नजीकच्या कुमठे फाटा येथे शुक्रवारी दुपारी दहावीची परीक्षा देऊन परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीला एका मालवाहतूक करणाऱ्या गाडीने जोरदार धडक दिली. या धडेकत एका चालकाचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी आहेत. या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

शुक्रवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. कुमठे गावातील विद्यार्थी पहिला पेपर देण्यासाठी नजीकच्या कवलापूर या गावी गेले होते. पेपर संपवून परत जात असताना विद्यार्थ्यांची गाडी आणि समोरून येणारी मालवाहतूक करणाऱ्या गाडीची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या आपघातात मालवाहतूक करणाऱ्या गाडीच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तवेरा गाडीमधील चालकासह नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये दोन विद्यार्थी आणि गाडीच्या चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच मालवाहतूक करणाऱ्या गाडीमधील तीन जण जखमी आहेत.