अमरावती : राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या घरासमोर जे आंदोलन झालं त्यामागे भाजपच असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. मी भाजपमध्ये देखील काम केलं, पण इतक्या खालच्या स्तरावरील हलकट राजकारण अनुभवले नाही असंही ते म्हणाले. ते अमरावती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या "संवाद बैठक" मेळाव्यात बोलत होते.


एकनाथ खडसे म्हणाले की, "महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत असे घाणेरडे राजकारण आपण पाहिले नाही. मी भाजपमध्ये देखील काम केलं, पण इतक्या खालच्या स्तरावरील हलकट राजकारण अनुभवले नाही. राजकारणात मतभेद आणि मनभेद असतात. पण मनभेद इतक्या टोकाला जातात हे आपण पवार साहेबांच्या घरावरील हल्ल्यानंतर अनुभवलं."


राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, "मी पुन्हा येईन हे आपण पाहिलं. मात्र मी पुन्हा मुख्यमंत्री होईल असं म्हणणाऱ्यांचा भ्रमनिरास झाला. भाजपने एसटीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, परवाच्या हल्ल्यामागे सूत्रधार हेच आहेत. राज्य सरकार आणि नेते भ्रष्टाचारी आहेत असं चित्र उभं करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. सरकार पाडण्यासाठी विरोधक देव पाण्यात ठेऊन बसले आहेत, पण सरकार काही पडत नाही."


महाविकास आघाडी सरकार तयार करून पवार साहेबानी एका रात्रीत सगळं चित्र बदललं. सरकार दिवसेंदिवस मजबूत होत आहे, आपण ते टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असंही एकनाथ खडसे म्हणाले. 


गेली वर्षानुवर्षे विदर्भाला राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केली आहे, परंतु अपेक्षित यश मिळाले नाही. नेते आणि कार्यकर्त्यांनी मिळून प्रयत्न केला तर ही पोकळी आपण भरू शकतो असं एकनाथ खडसे म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: