मुंबई : येत्या 48 तासांमध्ये राज्यात पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आयएमडीनं व्यक्त केली आहे. सध्या तापमान सर्वसाधारण आहे, मात्र त्यात वाढ होण्याची शक्यता आयएमडीचे संचालक व्ही के राजीव यांनी व्यक्त केली आहे.


तापमान वाढीमुळे शरिरातील पाण्याची पातळी खालावण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा आणि उन्हात घराबाहेर न पडण्याचा सल्ला आयएमडीकडून देण्यात आला आहे. तसंच घराबाहेर पडण्याची वेळ आल्यास शरीर पूर्णपणे झाकण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

मुंबईत काल शनिवारी संध्याकाळी सांताक्रुझमध्ये सर्वाधिक 32.7 अंश तापमान नोंदवण्यात आलं. यात येत्या 48 तासांमध्ये 36 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होऊ शकते.

मध्य भारतात उच्च दाबाचं क्षेत्र

मध्य भारतातील उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह राज्याचा पारा 2 ते 3 अंशानी वाढण्याची शक्यता आहे. तसंच पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमान वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.