बारामती : दुष्काळ निवारणाची जबाबदारी सरकारची असली तरी देवस्थान संस्थांनीही यात हातभार लावावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. सध्या सर्वत्र भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. साधारण आणखी काही वर्षे या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल, अशी चिंताही शरद पवार यांनी व्यक्त केली.
पुरंदर तालुक्यातील जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी डायलिसिस सेंटरचं उदघाटन आणि पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णवाहिका लोकार्पण आज शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना शरद पवार यांनी दुष्काळी परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. आणखी काही वर्षे हिच स्थिती राहिल, असा अंदाज आहे. दुष्काळ निवारणाची जबाबदारी केंद्र आणि राज्य शासनाची असली तरी देवस्थान संस्थांनीही हातभार लावला पाहिजे. अशा काळात देवस्थानांनी शिक्षणासारखी जबाबदारी स्वीकारावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
देशातील सध्यस्थितीवरही पवारांनी भाष्य केलं. निवडणुका येतील-जातील, पण देशाची लोकशाही टिकली पाहिजे ही भावना प्रत्येकांमध्ये असली पाहिजे. सध्या देशात काय सुरुय हे आपण सर्वजण पाहत आहोत. लोकशाहीत काहीही निकाल लागला तरी संस्थांवर हल्ले होणार नाहीत याची जबाबदारी जागृत नागरिकांनी घेणं गरजेचं आहे, असंही शरद पवार म्हणाले.
या कार्यक्रमात एका नेत्यानं शरद पवार हे माढ्यातून निवडणूक लढवत आहेत. जेजुरीच्या खंडेरायाचा आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी राहिल, अशा शुभेच्छा दिल्या. त्याचाच धागा पकडून सुप्रिया सुळे यांनी आता जेजुरीकर साहेबांना बारामतीतून निवडणूक लढायला सांगून आपल्याला माढ्याला पाठवतात की काय, या विचाराने आपल्या पोटात गोळा आला होता, असं सांगत उपस्थितांमध्ये हशा पिकवला.
देवस्थानांनी दुष्काळ निवारणासाठी दानपेट्या उघडाव्या, शरद पवारांचा सल्ला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Feb 2019 05:16 PM (IST)
दुष्काळ निवारणाची जबाबदारी सरकारची असली तरी देवस्थान संस्थांनीही यात हातभार लावावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -