सोलापूर : सोलापूर पोलिसांनी दरोडेखोर म्हणून गोळी घालून एन्काऊंटर केल्याच्या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. पोलिसांनी बनाव रचून हत्या केल्याचा आरोप मृत विनायक काळेच्या नातेवाईकांनी केला आहे. जिल्हा रुग्णालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विनायकचे नातेवाईक आंदोलनाला बसणार आहेत.
नातेवाईकांचा आरोप
मयत विनायक काळे यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी त्याचा थेट एन्काऊंटर केला. एका प्रकरणात पोलीस विनायककडे पैशाची मागणी करत होते, असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. विनायकच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचाही आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी नातेवाईकांनी केली असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
मयत विनायक हा बारावी पास होता. पोलीस दलात भरती होण्यासाठी विनायक रोज सराव करत होता. विनायक एक बहीण इंजिनिअर तर एक पदवीधर असून एमपीएससीची तयारी करत आहे. विनायकच्या अचानक मृत्यूने त्याच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांचं स्पष्टीकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विनायकवर याआधी तीन गुन्हे दाखल आहेत. या तीन गुन्ह्यांपैकी एक गुन्हा दरोड्याचा आहे. गेल्या काही दिवसांपासून डिझेल चोरी करणारी टोळी परिसरात कार्यरत होती. त्या टोळीत विनायक सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. तर राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या निकषाप्रमाणे या प्रकरणाची चौकशी होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये सोलापूरच्या उळे गावाजवळ चकमक झाली. या चकमकीत विनायक काळे हा दरोडेखोर ठार झाला आहे, तर तीन पोलीस जखमी झाले आहेत.
शनिवारी पहाटेच्या सुमारास उळे गावाजवळ गस्त घालताना तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांना पाच ते सहा दरोडेखोर दिसले असता पोलिसांनी त्यांना हटकले. त्यापैकी विनायकला पकडून गाडीत घालत असताना त्याच्यासह इतर सहकाऱ्यांनी हातातील तलवारीने पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या हातावर आणि मांडीवर तलवारीने हल्ला केला. तसेच दगडफेकही केली. या हल्ल्यात विजय पाटील गंभीर जखमी झाले होते.