पुणे : टेमघर धरणाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं समोर आल्यानंतर, आम आदमी पक्षाने पुण्यातील इतर धरणांच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसंच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे बिल्डर अविनाश भोसलेंना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप आप नेत्या प्रीती मेनन यांनी केला.
टेमघरसह वरसगाव आणि पवना धरणांमधून पाण्याची गळती होत असल्याचा दावा 'आप'ने केला. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन 'आप'ने यासंदर्भात माहिती दिली.
प्रीती मेनन यांचा आरोप
जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी श्रीनिवास एंटरप्रायजेस आणि प्रोग्रेसिव्ह एंटरप्रायजेस या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. परंतु सोमा एंटरप्रायजेसला त्यांनी वगळलं. कारण त्यांना अविनाश भोसलेंना वाचवायचं होतं. 'सोमा'कडून जेव्हा टेमघरचं काम झालं, तेव्हा अविनाश भोसले संचालक होते. या धरणांच्या दुरुस्तीसाठी संबंधीत कंत्राटदारांकडून खर्च वसूल करायला हवा. लोकांचे पैसै पुन्हा वाया घालवायला नकोत, असं प्रीती मेनन म्हणाल्या.
विजय पांढरेंचा दावा
धरणांच्या गळतीकडे गांभीर्याने पाहण्याची तसेच आंतरराष्ट्रीय निकषांनुसार धरणांची पाहणी करण्याची मागणी 'आप'चे नेते विजय पांढरे यांनी केली.
"धरणांच्या गळतीकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. या धरणांना धोका नसल्याचा दावा स्वीकारता येणार नाही. कारण या खात्यातील अधिकारी खरी माहिती देत नाहीत, असा माझा अनुभव आहे", असं पांढरे म्हणाले.
चितळेंवर निशाणा
"एका समितीने राज्यातील 136 धरणांच्या सुरक्षेचा अभ्यास केला. त्यातील माहितीनुसार बहुतांश धरणे आवश्यक एवढी मजबूत नाहीत. धरणं बांधताना 25 ते 30 तर कधी 45 ते 50 टक्के सिमेंटचा गैरव्यवहार होतो. धरणांच्या सुरक्षेबाबत चितळेंनी केलेली विधानं हास्यास्पद आहेत. धरण सुरक्षेच्या निकषांचा विचार केला, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची छी थू होईल. खात्यातील भ्रष्टाचार झाकण्यासाठी चितळेंकडून अशी विधानं होत आहेत", असं पांढरेंनी नमूद केलं.
धरणांच्या सुरक्षेचं ऑडिट करा
"ज्या अधिकाऱ्यावर धरणाच्या सुरक्षेचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती, त्या व्यक्तीने अवघ्या अर्ध्या तासात धरणाला भेट देऊन अहवाल दिला. त्यानंतर त्या अधिकाऱ्याची कोकण विभागाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. या धरणांच्या सुरक्षेचं ऑडिट आंतरराष्ट्रीय निकषांनुसार थर्ड पार्टी एजन्सीकडून करायला हवं", अशी मागणी पांढरेंनी केली.
तर खोतकर तुरुंगात जातील
महाराष्ट्राच्या मंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांची स्टाईल झाली आहे की, भ्रष्टाचाराचे आरोप झाले की मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटायचं आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चीट द्यायची. अर्जुन खोतकरांनीसुध्दा तेच केलं. आज 'आप'चे लोक मुख्यमंत्र्यांना भेटून खोतकरांच्या विरोधातले पुरावे देतील. खोतकरांची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत नाही तर सध्या पदावर असलेल्या न्यायाधीशांकडून व्हावी. निवृत्त न्यायाधीशांची चौकशी म्हणजे फार्स आहे. योग्या चौकशी झाली तर खोतकर तुरुंगात जातील, असा घणाघात प्रीती मेनन यांनी केला आहे.
दोनच दिवसांपूर्वी प्रीती मेनन यांनी जालन्यातील एपीएमसी घोटाळ्यात खोतकरांचा हात असल्याचा आरोप केला होता.
संबंधित बातम्या