खड्ड्यांमुळे अर्भक गर्भातच दगावलं, कुटुंबीयांचा आरोप
एबीपी माझा वेब टीम | 19 Aug 2016 03:59 AM (IST)
उस्मानाबाद: उस्मानाबादमधील कळंब तालुक्यातल्या बोरवंटी ते मंगरुळ पाटी दरम्यानच्या रस्त्यावरील खड्ड्यांनं घात केला आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महिलेच्या गर्भातच अर्भक दगावल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. ज्योती मुरगे असं या महिलेचं नाव आहे. सध्या या महिलेवर अंबाजोगाई रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं आहे. दरम्यान, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळेच आपल्या बाळाला गमवावं लागल्याचं महिलेच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईसह राज्यभर रस्त्यांवरील खड्ड्यांनं नागरिक हैराण झाले आहे. खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र, आता खड्ड्यांमुळे गर्भाशयातील अर्भकच गमवावं लागल्याची घटना समोर येत आहे.