रायगड : रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या तिघा कामगारांचा तेजस एक्स्प्रेसच्या धडकेत मृत्यू झाला. पेण आणि पनवेलच्या दरम्यान असलेल्या जिते रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री हा अपघात घडला.

रायगड जिल्ह्यातील जिते रेल्वे स्थानकाजवळ रविवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास मालगाडी उभी होती. त्यावेळी तिघा कामगारांना मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव 'तेजस एक्स्प्रेस'ने धडक दिली. यामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

या अपघातात 30 वर्षीय अशोक बारे, 45 वर्षीय भीमसेन गुलकर आणि 20 वर्षीय अजय दांगोदिया यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व कंत्राटी कामगार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्टेशन मास्तरने तात्काळ रेल्वे पोलिसांना कळवलं. तिघांचेही मृतदेह पेणच्या शासकीय रुग्णालयात  शवविच्छेदनासाठी पाठण्यात आले आहेत.