म्हसवडमधल्या चारा छावणीत साडेपाच हजार जनावरं दाखल
एबीपी माझा वेब टीम | 13 Jan 2019 11:04 PM (IST)
माणदेशी फाउंडेशनने म्हसवड येथे राज्यातली पहिली चारा छावणी सुरु केली आहे. या छावणीत साडेपाच हजारांहून अधिक जनावरं दाखल झाली आहेत.
सातारा : राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. राज्यात चारा छावण्या सुरु करणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने केली होती. माणदेशी फाउंडेशनने बजाज फाऊंडेशनच्या सहकार्याने म्हसवड येथे राज्यातली पहिली चारा छावणी सुरु करण्यात आली आहे. या छावणीत साडेपाच हजारांहून अधिक जनावरं दाखल झाली आहेत. साताऱ्याच्या माण तालुक्यातील म्हसवड हे गाव नेहमीच दुष्काळामुळे चर्चेत राहिले आहे. आठवड्याभरापूर्वी गावात चारा छावणी सुरु केल्यानंतर आता या छावणीत साडेपाच हजारांहून अधिक जनावरं दाखल झाली आहेत. त्यामुळे या चारा छावणीला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. कित्येक शेतकरी त्यांच्या जनावरांसह छावणीतच राहत आहेत. त्यामुळे छावणीमध्ये जनावरांसह शेतकऱ्यांचीही देखभाल केली जात आहे. माण तालुक्यात यंदाही गंभीर दुष्काळ असल्याने जनावरांना चारण्यासाठी चारा कोठेच उपलब्ध नाही. त्यामुळे दावणीवरच जनावरांचा हंबरडा सुरु आहे. चाऱ्याअभावी जनावरांची होत असलेली तडफड पाहुन बळीराजा चिंतेत आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्था शेतकऱ्यांचा मदतीसाठी धावल्या आहेत. या चारा छावणीत जनावरांसाठी दररोज ऊस, मका, पेंड, सरकी असे विविध प्रकारचे खाद्य दिले जात आहे, छावणीतल्या जनावरांना कोणताही आजार होऊ नये यासाठी फाऊंडेशनच्या वतीने खासगी डॉक्टरांची एक टीम तैनात ठेवली आले आहे.