मुंबई : कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने (Team India) टी-20 वर्ल्डकप (T20 worldcup) जिंकून जगभरात तिरंगा फडकावत देशाची मान उंचावली आहे. 140 कोटी भारतीयांना विश्वविजयाचा आनंद  दिल्यानंतर टीम इंडिया आज वर्ल्डकपसह क्रिकेटच्या पंढरीत येणार आहे. मुंबईत टीम इंडियाची मोठी रॅलीही निघणार असून त्यासाठी गुजरातहून खास बस आणण्यात आली आहे. त्यावरुन, आता वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. वर्ल्डकप आणि टीम इंडियाची रॅली ही मुंबईच्या 'बेस्ट' (BEST) बसमधून काढायला हवी, अशी मागणी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे. राजधानी दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया आता सायंकाळी मुंबईत येत आहे. 


टीम इंडियाने दिल्लीत सकाळी 11 च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर, सर्व खेळाडूंसह टीम इंडिया मुंबईकडे रवाना झाली आहे. मुंबईत टीम इंडियाची विजयी यात्रा काढण्यात येणार असून ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवरही जाईल. या ठिकाणी भारतीय संघाच्या स्वागतासाठी जंगी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या रॅलीसाठी टीम इंडिया ज्या बसमधून मुंबई दर्शन करणार आहे, ती बस खास गुजरातहून मागवण्यात आली आहे. त्यावरुन, आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 


भारतीय संघाला सर्वांनी ताकद दिली, त्यामुळे टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला, त्याचा आम्हाला आनंद आहे. आता, टीम इंडिया वर्ल्डकपसह महाराष्ट्रात,विशेष करुन मुंबईत येत आहे. मग, ही रॅली महाराष्ट्रातील बसमधूनच, मुंबईतील बेस्ट बसमधून काढायला हवी. कारण, मुंबई शहर प्रवासाच्या बाबतीत अत्यंत सुखद आहे, मग मुंबईत वर्ल्डकप येत असेल तर बेस्टच्या बसचा वापर केल्यास आम्हाला आनंद होईल. आम्ही त्यासाठी बीसीसीआयकडे विनंती करू, शेवटी तेच निर्णय घेतील, असे आमदार आणि महाराष्ट्र क्रिकेट संघाचे अध्यक्ष रोहित पवार यांनी म्हटले. 


वर्ल्डकप टीमच्या रॅलीसाठी आलेल्या गुजरातच्या बसला आम्ही चांगली पार्कींगची जागा देऊ. पण, बेस्ट बसचा वापर केला पाहिजे. बीसीसीआयने मोठी आणि चांगली बस आणली असेल, पण आमच्या भावना बेस्टसोबत जोडलेल्या आहेत. त्यामुळे, टीम इंडियाच्या रॅलीत बेस्टची बस वापरल्यास आम्हाला अधिक आनंद होईल, असेही रोहित पवार यांनी म्हटले. दरम्यान, टीम इंडिया आज मायदेशी परतली आहे. सकाळी 6 वाजता टीम इंडियाचं विशेष विमान दिल्लीत दाखल झालं. 29 जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारताने तब्बल 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर भारतीय संघ आज (4 जुलै) भारतात परतला आहे. यावेळी टीम इंडियाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे. 




मुंबईतील रॅली मोबाईलवर पाहता येईल


टीम इंडियाची मुंबईतील विजयी रॅली मोबाईलवर पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्सवर सायंकाळी 4 वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्स 1, हिंदी 1, 3 आणि त्यांच्या YouTube चॅनेलवर प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे जे चाहते मुंबईत पोहचू शकणार नाही, त्यांना आता टीव्ही आणि मोबाईलद्वारे या विजयी रॅलीचा आनंद घेता येणार आहे.


वानखेडे स्टेडियमवर होणार सन्मान


भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमचे विशेष स्थान आहे. याच स्टेडियमवर भारताने 2011 सालचा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक उंचावला होता. आता, याच स्टेडियमवर आज भारताच्या टी-20 विश्वविजेत्या संघाचाही सन्मान होणार आहे.