मुंबई : शाळेत आता शिक्षकांना विद्यार्थ्यांबरोबर दर आठवड्याला सेल्फी काढावा लागणार आहे. येत्या जानेवारी महिन्यापासून शाळांमधला दर सोमवारचा पहिला तास हा सेल्फीचा ठरणार आहे. पटपडताळणीसाठी शिक्षण विभागाने ही अनोखी शक्कल लढवली आहे.
देशातली 18 टक्के मुले पटावर नोंद असूनही प्रत्यक्षात शाळेत येत नाहीत. त्यामुळे हजेरीची सातत्याने पडताळणी करण्यासाठी आधी बायोमेट्रिकचा पर्याय स्वीकारण्यात आला. पण आता त्यापेक्षा सेल्फीचा पर्याय सोपा असल्याने त्याच्या अंमलबजावणीचे आदेश सोडण्यात आले आहेत.
शिक्षकांनी सोमवारच्या सकाळी प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांचा गट तयार करुन सेल्फी काढून शासनाच्या 'सरल' या प्रणालीवर अपलोड करावा लागणार आहे. इतकंच नाही, तर अनियमित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव, त्यांचा आधारक्रमांक आणि त्यांच्यासोबतचा सेल्फीही शिक्षकांना 'सरल'वर अपलोड करावे लागणार आहे.
वर्गातील मुलांची हजेरी आणि शिक्षकांनी दिलेल्या छायाचित्रातील तपशिलांची पडताळणी करण्यात येणार आहे. जानेवारी 2017 पासून हा उपाय अमलात आणण्यात येणार आहे.