बुलडाणा: बुलडाणा आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिले आहेत. नागपूर सीआयडी विभागाच्या पोलीस अधीक्षका आरती सिंग या तात्काळ खामगावला भेट देणार आहेत.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास बुलडाण्याच्या अतिरिक्त पोलीस अधिक्षिका श्वेता खेडेकर यांच्या निदर्शनाखाली होणार आहे. दरम्यान, या बलात्कारप्रकरणी 10 जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिवरखेड पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. इतर तीन आरोपींचा शोध अद्याप सुरु आहे.

बाळा शिवार परिसरातील कोकरे आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव आहे. शाळेतील कर्मचाऱ्यांनीच हे कृत्य केल्याचा आरोप मुलीने केला आहे. विशेष म्हणजे ही घटना दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी घडली आहे. त्यामुळे आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच आरोपींवर अॅट्रासिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

आश्रमशाळेत डझनभर आदिवासी मुलींवर बलात्कार : मलिक

दरम्यान, बुलडाण्यातील आश्रमशाळेत डझनभर आदिवासी मुलींवर बलात्कार झाल्याचा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा आहे. शिवाय महिलांवरील अत्याचारांच्या घटनांची संख्याही जास्त आहे, असं सांगत आदिवासी मंत्री आणि महिला आणि बालविकास मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणीही नवाब मालिक यांनी केली.

संबंधित बातम्या:
बुलडाण्यातील आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार