मुंबई : बारावी बोर्डाची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा आजपासून सुरु होत आहे. मात्र निवडणूक आयोगाने शिक्षकांना प्रशिक्षणासाठी बोलावल्यामुळे या परीक्षा होणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे.


राज्यातील हजारो शिक्षकांना निवडणूक कामांच्या प्रशिक्षणाला हजर राहावं लागणार आहे. त्यामुळे शिक्षक या परीक्षांना न जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परीक्षा होणार की नाही, असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

पुढच्या आठवड्यापासून दहावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेला सुरुवात होत आहे. या परीक्षेवरही प्रश्नचिन्हच आहे. राज्य कनिष्ठ महाविद्यालय संघटनेनं परीक्षा पुढे ढकलण्याची किंवा शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची मागणी केली आहे.

मात्र या संदर्भात आपण योग्य त्या सूचना परीक्षा बोर्डाला केल्या असून तशी व्यवस्था बोर्डानं केली असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी म्हटलं आहे.