बीड : जी व्यक्ती हयात नाही त्यांच्या जन्मतारखेवर भाष्य करणं हे चुकीचं आहे. अजित पवार यांचा अभ्यास कमी असल्यामुळेच ते असं बोलले, अशी टीका राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे.


धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरुनच अजित पवार बोलत आहेत, असा आरोपही पंकजा मुंडे यांनी केला.

पवारांना पाहून मुंडेंनी वाढदिवस ठरवला : अजित पवार
गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांचाही वाढदिवस 12 डिसेंबरला असल्याचा सार्वत्रिक समज आहे. मात्र तपशील काढून पाहिल्यास मुंडेंनी जन्मतारीख बदलल्याचं समजेल, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘माझा कट्टा’वर केला होता. ही माहिती खुद्द गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

मनमोहन सिंहांनी मुंडेंना काँग्रेसमध्ये घेतलं नाही, अजित पवारांचा गौप्यस्फोट

गोपीनाथ मुंडे यांची खरी जन्मतारीख त्यांच्या आई-वडिलांना ठाऊक नव्हती. 1980 च्या सुमारास पवारांभोवती वलय होतं. त्यांचा वाढदिवस राज्यभरात उत्साहाने साजरा केला जातो, हे पाहूनच मुंडेंचा वाढदिवस 12 डिसेंबर जाहीर करण्यात आला, असंही अजित पवार म्हणाले.

अजित पवारांचं वक्तव्य कुटुंबीयांसाठी वेदनादायी
पण गोपीनाथ मुंडेंना जर जन्मतारीख बदलायची असती, तर अटल बिहारी वाजपेयी यांची जन्मतारीख लावली असती. अजित पवारांचं हे वक्तव्य माझ्या कुटुंबीयांसाठी वेदनादायी असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

''गोपीनाथ मुंडेंनी जन्म तारीख बदलल्याचा आरोप धादांत खोटा''

पवारांच्या घरी संस्काराची कमी
पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मी नेहमी शरद पवार यांचा आदर, सन्मान केला आहे. हा माझ्या संस्काराचा भाग आहे. पण अजित पवार यांच्या वक्तव्यावरुन पवारांच्या घरात संस्काराची कमी असल्याचं दिसतं."

तसंच गोपीनाथ मुंडेंनी काँग्रेसमध्ये जाण्याबद्दल माझ्याशी कधीच चर्चा केली नाही. आमदार असताना मी त्यांच्यासोबत दिल्लीलाही गेले नाही, असा दावाही पंकजा यांनी केला आहे.

पाहा व्हिडीओ