मुलांची आकलनशक्ती वाढावी, त्यांना शाळेत जाण्याची गोडी लागावी यासाठी पालक आपल्या पाल्यांना नर्सरीपासून शिक्षण देत असतात. त्याचप्रमाणे या साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याच्या पालाकांनीसुद्धा शहरातील एका खासगी शाळेमध्ये त्याला दाखल केले. परंतु त्यांचा मुलगा अभ्यासात मागे असल्याने शिक्षिकेने त्याला अंगावर व्रण उमटेपर्यंत मारहाण केली आहे.
या चिमुरड्याच्या आईने मारहाणीबद्दल शाळेकडे विचारणा केली त्यावेळी शाळा व्यवस्थापनाने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले तेव्हा शाळा व्यवस्थापनाने चूक मान्य करत संबंधित शिक्षिकेला कामावरुन काढून टाकले.
मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडीओ
दरम्यान, चिमुरड्याच्या पालकानी गंगापूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी संस्थाचालक आणि शिक्षिकेला चौकशीसाठी बोलावून घेतले. शिक्षिकेने घरच्या ताणतणावातून मारहाण केल्याची माहिती पोलिसांना दिली. शिक्षिकेच्या भवितव्याचा विचार करता पालकांनी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला नाही. पोलिसांनी समज देवून तिला सोडून दिले आहे.