यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील ढाकोरी गावातील महिलांनी दुचाकीवरुन अवैध दारु तस्करी करणाऱ्यांना पकडले असता तस्करांनी महिलांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. शिवाय दारु विकेत्यांनी पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केल्याची माहिती मिळाली आहे.


यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील अनेक गाव अवैध दारू विक्री मुळे त्रस्त आहेत. यवतमाळ जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे. अशावेळी चोरट्या पद्धतीने अवैध दारू विक्रेते दारू तस्करी करतात. दुचाकीवरुन अवैध दारु तस्करी केली जात आहे, अशी माहिती ढाकोरी गावातील महिलांना मिळाली.

ढाकोरी गावातील महिलांनी एकत्र येत (शुक्रवारी) रात्री 9 वाजताच्या सुमारास दारु तस्करी करणाऱ्यांना पकडले. यावेळी या महिला दारु तस्करांना घेऊन शिरपूर पोलीस स्टेशनकडे जात असताना दारु विक्रेत्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी कुराई गावाजवळ अडवून महिलांना मारहाण केली. शिवाय दारु तस्करीसाठी वापरण्यात आलेली दुचाकीही पेटवून दिली.

मारहाणीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता दारु विक्रेत्यांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यादरम्यान पोलिसांनी गाडीतून पळ काढला. संधी साधून दारू विक्रेत्यांनी पोलिसांची गाडी उलटवून दिली.

त्यानंतर मोठ्या फौजफाट्यासह पोलीस कुराई गावात पोहोचले. त्यादरम्यान पोलिसांनी काही दारु विक्रेत्यांना ताब्यात घेतले. दारु विक्रेत्यांकडून झालेल्या मारहाणीमध्ये सहा महिला जखमी झाल्या असून एका महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या महिलांचे जवाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. अवैध दारू विक्रेत्यांची पोलीस धरपकड करीत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.