मुंबई : अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता पुन्हा निर्माण झाली आहे. मावळमधून पार्थ पवारांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.


शरद पवारांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत पार्थ पवारांच्या उमेदवारीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. पार्थ यांना उमेदवारी द्यावी, यासाठी स्थानिक कार्यकर्ते आग्रही असल्याचं नेत्यांचं मत आहे. मात्र अद्याप पार्थ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेलं नाही.

पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघात फिरायला सुरुवात केली होती. लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघनिहाय बैठकीत पार्थ पवार यांचं नाव देखील चर्चेत आलं होतं. पण पवार आजोबांनी नातवाच्या एंट्रीला ब्रेक मारल्याचं म्हटलं जात होतं.

पवार घरातील सगळ्यांनी निवडणूक लढवली तर कार्यकर्ते काय करणार? असा प्रश्न पहिल्याच बैठकीत उपस्थित झाला होता. त्यानंतरही पार्थ पवार यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत.

प्रसारमाध्यमात चर्चा होत असल्याने पवारांनी ते आणि सुप्रिया सुळे फक्त लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं होतं. इतकंच काय, सुप्रिया सुळेंनी 'एबीपी माझा'च्या 'माझा ट्विटर कट्टा' या कार्यक्रमात आपल्या मुलांनी राजकारणात येऊ नये, अशी मनिषा बोलून दाखवली होती. त्यामुळे पार्थ पवारांच्या उमेदवरीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.