चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये एका शिक्षिकेनं विद्यार्थिनीचे केस मुळासकट उपटून तिला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने पालकवर्गातून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.


चंद्रपूरच्या प्रतिष्ठित माऊंट कार्मेल शाळेत केजीत शिकणाऱ्या निवेदिताला शिक्षिकेने मारहाण केल्याचं समोर आलं आहे. सोमवारी निवेदिता घरी आल्यावर आईनं तिचे केस विंचरले आणि अचानक तिच्या डोक्यात कळ गेली. आईनं निवेदिताचे केस पाहिले आणि पुरती हादरुन गेली.

यावेळी निवेदिताचे केस मुळासकट उपटलेले असल्याचे तिच्या आईला दिसले, यासंबंधी विचारणा केल्यावर वर्गात टीचरनं मारल्याचं निवेदितानं सांगितलं.

संतापाच्या भरात निवेदिताच्या कुटुंबानं शाळेत धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार मुख्यध्यापकांना सांगितला. सुरुवातीला या संपूर्ण प्रकरणी शाळा प्रशासनाने टाळटाळ केली. मात्र, मुलीच्या पालकांनी सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचा जेव्हा आग्रह धरला त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस झाला. यामध्ये शिक्षिकेने निवेदितासह इतरही विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचं समोर आलं.



सीसीटीव्हीमध्ये फक्त निवेदिताच नाही तर तिच्यासोबत असलेल्या आणखी काही विद्यार्थ्यांना शिक्षिकेनं अशीच अमानुष मारहाण केल्याचं दिसून आलं. त्यानंतर निवेदिताच्या पालकांनी शिक्षिकेविरुद्ध पोलिसात तक्रार केली.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित शिक्षिकेला शाळेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

पालक मुलांच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करतात. वर्गात काय होतं याची वाच्यता मुलं पालकांकडे करत नाहीत. त्यामुळे तुमची निरागस मुलं भीती आणि दहशतीनं खचून तर जात नाही ना? याकडे वेळीच लक्ष द्या!